Add parallel Print Page Options

येशू आमचा साहाय्यकर्ता

माझ्या प्रिय मुलांनो, तुम्ही पाप करु नये यासाठी मी तुम्हांला या गोष्टी लिहीत आहे, पण जर एखादा पाप करतो तर पित्याकडे आमच्या वतीने विनवणी करणारा मध्यस्थ आमच्याकडे आहे. तो येशू ख्रिस्त आहे, जो नीतिमान आहे. तो अर्पण आहे जो आमचे पाप आमच्यापासून काढून घेतो आणि केवळ आमचेच पाप नव्हे तर सगळ्या जगाचे पाप काढून घेतो.

जर आम्ही त्याच्या आज्ञा पाळतो तर हाच मार्ग आहे ज्याविषयी आम्हाला खात्री आहे की, आम्ही देवाला खऱ्या अर्थाने ओळखले आहे. जो असे म्हणतो की, “मी देवाला ओळखतो!” आणि त्याच्या आज्ञा पाळत नाही तर तो लबाड आहे; आणि त्याच्यामध्ये सत्य नाही. पण जर कोणी देवाची शिकवण पाळतो, तर देवाविषयीचे त्याचे प्रेम त्याच्यामध्ये पूर्ण झाले आहे. हाच मार्ग आहे ज्याद्वारे आम्ही खात्री बाळगू शकतो की, आम्ही देवामध्ये आहोत. मी देवामध्ये राहतो असे जो म्हणतो, त्याने जसा येशू जगला तसे जगले पाहिजे.

इतर लोकांवर प्रेम करा अशी देवाने आज्ञा दिली

प्रिय मित्रांनो, मी तुम्हांला नवी आज्ञा लिहीत नाही तर जुनीच आज्ञा लिहीत आहे, जी तुम्हांला सुरुवातीपासूनच देण्यात आली होती. ती जुनी आज्ञा म्हणजे जो संदेश तुम्ही ऐकला आहे तीच आज्ञा आहे. शिवाय नवीन आज्ञेप्रमाणे मी तिजविषयी लिहीतो कारण या गोष्टीविषयीचे सत्य ख्रिस्ताच्या जीवनामध्ये आणि तुमच्या जीवनामध्ये दर्शविण्यात आली. कारण अंधार नाहीसा होत आहे व खरा प्रकाश अगोदरपासूनच प्रकाशत आहे.

जो असे म्हणतो की तो प्रकाशात आहे आणि तरीही आपल्या भावाचा द्वेष करतो तो अजूनसुद्धा अंधारात आहे. 10 जो आपल्या भावावर प्रेम करतो तो प्रकाशात राहतो, आणि त्याच्या जीवनामध्ये अशी कोणतीही गोष्ट नसते, जी एखाद्याला पापात पडण्यास भाग पाडते. 11 पण जो आपल्या भावाचा द्वेष करतो तो अंधारात आहे. तो अंधारात जगत आहे व तो कोठे जात आहे हे त्याला कळत नाही. कारण अंधारामुळे तो आंधळा झालेला आहे.

12 प्रिय मुलांनो, मी तुम्हांला लिहीत आहे,
    कारण ख्रिस्तामुळे तुमच्या पापांची क्षमा झालेली आहे.
13 वडिलांनो, मी तुम्हांला लिहितो
    कारण जो सुरुवातीपासून अस्तित्वात आहे, त्याला तुम्ही ओळखता. तरुणांनो,
मी तुम्हांला लिहीत आहे,
    कारण दुष्टावर तुम्ही जय मिळविला आहे.
14 मुलांनो, मी तुम्हांला लिहीत आहे,
    कारण तुम्हांला पिता माहीत आहे.
वडिलांनो, मी तुम्हांला लिहिले,
    कारण जो सुरुवातीपासून अस्तित्वात आहे.
    त्याची तुम्हांला ओळख झाली आहे.
तरुणांनो, मी तुम्हांला लिहिले,
    कारण तुम्ही सशक्त आहात;
देवाचे वचन तुमच्यामध्ये राहते,
    कारण तुम्ही दुष्टावर मात केली आहे.

15 जगावर किंवा जगातील गोष्टींवर प्रेम करु नका. जर कोणी जगावर प्रेम करतो, तर पित्याविषयी त्याच्या अंतःकरणात प्रेम नाही. 16 कारण जगात जे सर्व काही आहे, ते म्हणजे पापी देहाला संतोषविणारी लैंगिक वासना, डोळ्यांची वासना, व संसाराविषयीची फुशारकी हे पित्यापासून नाहीत, तर जगापासून आहेत. 17 जग व जगातील वासना नाहीशा होत आहेत. पण जो देवाच्या इच्छेप्रमाणे करतो तो अनंतकाळपर्यंत जगेल.

ख्रिस्ताच्या शंत्रूंना अनुसरु नका

18 माझ्या मुलांनो, शेवट जवळ आला आहे आणि तुम्ही ऐकल्याप्रमाणे ख्रिस्तविरोधी येत आहेत आणि आताही पुष्कळ ख्रिस्तविरोधी दिसू लागले आहेत. त्यामुळेच आम्हाला कळते की, शेवट जवळ आला आहे. 19 ते आमच्यातूनच बाहेर निघाले, पण ते खऱ्या अर्थाने आमच्यातील नव्हतेच, मी हे म्हणतो कारण जर ते खरेच आमच्यातील असते तर ते आमच्यात राहिले असते. पण ते गेले यासाठी की, त्यांना आम्हांला दाखवायचे होते की त्यांच्यातील कोणीच आमचा नव्हता.

20 पण जो पवित्र असा ख्रिस्त याने तुमचा आत्म्याने अभिषेक केला आहे, म्हणून तुम्हा सर्वांना सत्य माहीत आहे. 21 मी तुम्हांला सत्य माहीत नाही म्हणून लिहीत नाही पण तुम्हांला ते माहीत आहे कारण सत्यापासून कोणतेच असत्य येत नाही.

22 येशू हा ख्रिस्त नाही असे म्हणणारा खोटा नाही काय? असा मनुष्य ख्रिस्तविरोधी आहे. तो पिता आणि पुत्र या दोघांनाही नाकारतो. 23 जो पुत्राचा नाकार करतो त्याला पिताही नसतो, पण जो पुत्राला मानतो त्याला पिताही असतो.

24 तुमच्या बाबतीत जे तुम्ही सुरुवातीपासून ऐकले आहे, त्यामध्येच राहा, सुरुवातीपासून जे तुम्ही ऐकले त्यात जर तुम्ही राहाल, तर तुम्ही पुत्रामध्ये व पित्यामध्ये राहाल. 25 आणि देवाने आम्हांला जे देण्याचे अभिवचन दिले आहे: ते म्हणजे अनंतकाळचे जीवन होय.

26 जे तुम्हाला फसविण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांच्याविषयी मी तुम्हांला या गोष्टी लिहीत आहे. 27 पण तुमच्याबाबतीत म्हटले तर, ज्या (पवित्र व्यक्तीकडून) तुम्हांला अभिषेक करण्यात आला तो तुमच्यामध्ये राहतो. म्हणून दुसऱ्या कोणी तुम्हांला शिकवावे याची गरज नाही. त्याऐवजी ज्या आत्म्यासह तुमचा अभिषेक (पवित्र व्यक्तीकडून) झाला या सर्व गोष्टीविषयी तो तुम्हांला शिकवितो आणि लक्षात ठेवा की, तो खरा आहे आणि खोटा मुळीच नाही. जसे त्याने तुम्हाला जे करण्यास शिकविले आहे तसे तुम्ही ख्रिस्तामध्ये राहा.

28 म्हणून आता, प्रिय मुलांनो, ख्रिस्तामध्ये राहा, यासाठी की, जेव्हा ख्रिस्त प्रकट होइल, तेव्हा आम्हांला दृढविश्वास मिळेल व जेव्हा तो परत येतो तेव्हा त्याच्याद्वारे आम्ही लज्जित केले जाणार नाही. 29 जर तुम्हांला माहीत आहे की, ख्रिस्त नीतिमान आहे तर जे लोक चांगले काम करतात ते देवाचे पुत्र आहेत हे देखील तुम्हाला कळेल.