Add parallel Print Page Options

देव त्याच्या लोकांना उत्तर देईल

18 त्यांनी नेहमी आशा न सोडता प्रार्थना करावी व ती करण्याचे कधीच सोडू नये हे शिकविण्यासाठी त्याने त्यांना एक बोधकथा सांगितली. तो म्हणाला, “एका नगरात एक न्यायाधीश होता. तो देवाला भीत नसे लोकांना मानही देत नसे. त्या नगरात एक विधवा होती. ती वारंवार येत असे व न्यायाधीशाला म्हणत असे, ‘माझ्या विरोधकांविरुद्ध मला न्याय मिळेल असे बघा!’ काही काळ त्याची इच्छा नव्हती पण शेवटी तो स्वतःशीच म्हणाला, ‘मी जरी देवाला भीत नाही व लोकांना मान देत नाही. तरीही ती विधवा मला त्रास देत असल्याने तिला न्याय मिळेल असे मी करतो, यासाठी की ती वारंवार येऊन मला बेजार करणार नाही.’”

मग प्रभु म्हणाला, “अनीतिमान न्यायाधीश काय म्हणाला त्याकडे लक्ष द्या. आणि मग जे देवाचे निवडलेले लोक रात्रंदिवस त्याचा धावा करतात त्यांचा तो न्याय करणार नाही काय? तो त्यांना मदत करावयास वेळ लावील काय? मी तुम्हांस सांगतो, तो त्यांना न्याय देईल. तरीही जेव्हा मनुष्याचा पुत्र येतो, तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास आढळेल काय?”

देवाबरोबर योग्य ते संबंध असणे

अशा लोकांना जे स्वतःनीतिमान असल्याचा अभिमान बाळगत होते व इतरांना कमी लेखत होते, अशा लोकांसाठी येशूने ही गोष्ट सांगितली. 10 “दोघे जण प्रार्थना करावयास वर मंदिरात गेले. एक परुशी होता व दुसरा जकातदार होता. 11 परुशी उभा राहिला व त्याने अशी प्रार्थना केली, ‘हे देवा, मी तुझे उपकार मानतो कारण, इतर लोकांसारखा म्हणजे चोर, फसविणारा, व्यभिचारी व या जकातदारासरखा मी नाही. 12 उलट मी आठवड्यातून दोनदा उपास करतो, व माझ्या सर्व उत्पन्नाचा दहावा भाग देतो.’

13 “परंतु जकातदार दूर अंतरावर उभा राहिला व आपले डोळे स्वर्गाकडे वर न उचलता आपली छाती बडवीत म्हणाला, ‘हे देवा, मज पापी माणसावर दया कर!’ 14 मी तुम्हांला सांगतो हा मनुष्य, त्या दुसऱ्या माणसापेक्षा नितीमान ठरुन घरी गेला. कारण जो कोणी स्वतःला उंच करतो त्याला नीच केले जाईल आणि जो कोणी स्वतःला नीच करतो त्याला उंच केले जाईल.”

देवाच्या राज्यात कोण प्रवेश करील?(A)

15 आणि ते आपल्या बालकांनादेखील त्याच्याकडे आणीत यासाठी की त्याने त्यांना स्पर्श करावा. पण जेव्हा शिष्यांनी हे पाहिले तेव्हा ते त्यांना दटावू लागले. 16 पण येशूने बाळकांना त्याच्याकडे बोलाविले आणि म्हणाला, “बालकांना मजकडे येऊ द्या. त्यांना अडवू नका. कारण देवाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे. 17 मी खरोखर तुम्हांला सांगतो, जो कोणी देवाच्या राज्याचा बालकासारखा स्वीकार करीत नाही. त्याचा स्वर्गात प्रवेश होणार नाही.”

एक श्रीमंत मनुष्य येशूला प्रश्न विचारतो(B)

18 एका यहूदी पुढाऱ्याने त्याला विचारले, “उत्तम गुरुजी, अनंतकाळचे जीवन मिळविण्यासाठी मी काय करु?”

19 येशू त्याला म्हणाला, “मला उत्तम का म्हणतोस? देवाशिवाय कोणीही उत्तम नाही. 20 तुला आज्ञा माहीत आहेतः ‘व्यभिचार करु नको, खून करु नको, चोरी करु नको, खोटी साक्ष देऊ नको, तुझ्या आईवडिलांचा मान राख.’” [a]

21 तो पुढारी म्हणाला, “या सर्व आज्ञा मी माझ्या तरुणपणापासून पाळल्या आहेत.”

22 जेव्हा येशूने हे ऐकले, तेव्हा तो त्याला म्हणाला, “तुझ्यामध्ये अजून एका गोष्टीची उणीव आहे: तुझ्याजवळचे सर्व काही विकून ते गरिबांना वाट, म्हणजे स्वर्गात तुला संपत्ती मिळेल. मग ये. माझ्या मागे चल.” 23 पण जेव्हा त्या पुढाऱ्याने हे ऐकले तेव्हा तो फार दु:खी झाला, कारण तो फार श्रीमंत होता.

24 जेव्हा येशूने पाहिले की, तो दु:खी झाला आहे, तो म्हणाला, “ज्यांच्याजवळ धन आहे, त्या लोकांचा देवाच्या राज्यात प्रवेश होणे किती कठीण आहे! 25 होय, श्रीमंत माणसाचा देवाच्या राज्यात प्रवेश होणे यापेक्षा उंटाने सुईच्या छिद्रातून जाणे सोपे आहे.”

कोणाचे तारण होईल?

26 नंतर ज्या लोकांनी हे ऐकले, ते म्हणाले, “तर मग कोणाचे तारण होईल?”

27 येशू म्हणाला, “ज्या गोष्टी माणसांना अशक्य आहेत त्या देवाला शक्य आहेत.”

28 मग पेत्र म्हणाला, “पाहा, आमच्याकडे जे होते, ते सर्व सोडून आम्ही तुमच्यामागे आलो आहोत.”

29 येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हांस खरे सांगतो, असा कोणीही नाही की ज्याने देवाच्या राज्यासाठी आपले घर किंवा पत्नी कींवा भाऊ, किंवा आईवडील सोडले आहेत, त्यांस या काळात व 30 येणाऱ्या काळातील अनंतकाळात याच्यापेक्षा कित्येक पटींनी मिळाले नाही.”

येशू मरणातून उठेल(C)

31 येशूने बारा प्रेषितांना बाजूला घेतले आणि त्यांना म्हणाला, “ऐका! आपण वर यरुशलेमास जात आहोत आणि भविष्यवाद्यांनी मनुष्याच्या पुत्राविषयी जे काही लिहिले होते ते पूर्ण होईल. 32 होय, त्याला विदेश्यांच्या हाती धरुन देण्यात येईल, त्याची कुचेष्टा होईल, त्याची निंदा करतील, त्याच्यावर थुंकतील. 33 ते त्याला चाबकाचे फटके मारुन रक्तबंबाळ करुन ठार करतील. आणि तो तिसऱ्या दिवशी मरणातून उठेल.” 34 शिष्यांना यातील काहीही कळाले नाही. कारण हे वचन त्यांच्यापासून लपवून ठेवण्यात आले होते. आणि तो कशाविषयी बोलत आहे हे त्यांना माहीत नव्हते.

येशू एका आंधळ्यास बरे करतो(D)

35 येशू यरीहोजवळ येत असताना एक आंधळा रस्त्यावर बसून भीक मागत होता. 36 जेव्हा त्या आंधळ्या मनुष्याने जवळून जाणाऱ्या समुदायाचा आवाज ऐकला तेव्हा त्याने विचारले हे काय चालले आहे.

37 त्यांनी त्याला सांगितले की, “नासरेथकर येशू जात आहे.”

38 तो मोठ्याने ओरडून म्हणाला, “येशू दाविदाच्या पुत्रा माझ्यावर दया कर!”

39 जे पुढे चालले होते त्यांनी त्याला गप्प राहण्यास सांगितले. परंतु तो आणखी मोठ्याने ओरडून म्हणाला, “दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा!”

40 येशू थांबला, आणि त्याने आंधळ्याला आपणांकडे आणण्याची आज्ञा केली, जेव्हा आंधळा जवळ आला, तेव्हा येशूने त्याला विचारले, 41 “तुला काय हवे?”

आंधळा मनुष्य म्हणाला, “प्रभु, मला परत दृष्टी प्राप्त व्हावी.”

42 येशू त्याला म्हणाला, “तुला दृष्टि येवो: तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.”

43 तत्काळ त्याला दृष्टि आली आणि देवाचे गौरव करीत तो येशूच्या मागे गेला. सर्व लोकांनी हे पाहिले आणि देवाची स्तुति केली.