Add parallel Print Page Options

तुम्ही यहूदीसुद्धा पापी आहात

म्हणून हे मनुष्या, तू जो कोणी आहेस व जेव्हा तू न्यायासनासमोर बसतोस तेव्हा तुला सबब नाही, कारण जेव्हा तू दुसऱ्यांचा न्याय करतोस तेव्हा तू स्वतःलाही दोषी ठरवितोस कारण जो तू न्याय करतोस, तो तूही तीच गोष्ट करतोस. आता आपणांला माहीत आहे की, जे अशा वाईट गोष्टी करतात त्यांचा न्याय देव करतो. आणि देवाचा न्याय योग्य असतो. तुम्हीसुद्धा जे अशा वाईट गोष्टी करतात त्यांचा न्याय करता पण तुम्हीसुद्धा त्याच गोष्टी करता म्हणून निश्चितपणे तुम्हांला माहीत आहे की, देव तुमचा न्याय करील आणि स्वतःची सुटका करुन घेणे तुम्हांला शक्य होणार नाही. देव तुमच्याशी अत्यंत दयाळूपणे वागतो. तो तुमच्याशी सहनशीलतेने वागतो, तुमच्यामध्ये बदल व्हावा म्हणून देव वाट पाहतो, पण त्याच्या दयाळूपणाबद्दल तुम्ही काहीच विचार करीत नाही. कदाचित तुम्ही तुमचे मन व जीवन बदलावे म्हणून देव तुमच्याशी दयाळूपणे वागतो हे तुम्हांला समजत नसेल.

पण तुम्ही लोक कठीण व उद्धट मनाचे आहात, तुम्ही बदलण्यास तयार नाही, त्यामुळे तुम्ही स्वतःच तुमची शिक्षा अधिकाधिक वाढवित आहात. जेव्हा देव (तुम्हाला) त्याचा क्रोध दर्शवील, त्यावेळी तुम्हांला शिक्षा होईल. त्या दिवशी लोक देवाचा यथायोग्य न्याय पाहतील. देव प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे फळ देईल. नेटाने चांगले करीत राहून गौरव, मान, अमरत्व मिळविण्याचा जे लोक प्रयत्न करतात त्यांना तो अनंतकाळचे जीवन देईल. परंतु जे स्वार्थीपणामुळे सत्यात चालणे नाकारतात, व अनीतिने चालतात त्यांची तो क्रोधाने भरपाई करील. जो जे वाईट ते करतो, त्या प्रत्येक मानवावर संकटे आणि दु:खे येतील. म्हणजे पहिल्यांदा यहूद्यांवर व नंतर ग्रीक लोकांवर येतील. 10 परंतु जो चांगली कृत्ये करतो त्या प्रत्येकाला गौरव, मान आणि शांति मिळेल. प्रथम यहूद्यांना व मग ग्रीक लोकांना मिळेल. 11 देवाजवळ पक्षपात नाही.

12 जे सर्व नियमशास्त्राबाहेर असून पाप करतात, ते नियमशास्त्राबाहेर नाश पावतील. व जितक्यांनी नियम शास्त्राधीन असून पाप केले तितक्यांना नियमशास्त्रानुसार शिक्षा होईल. 13 कारण जे नियमशास्त्र ऐकतात ते देवाच्या दृष्टीने नितिमान आहेत असे नाही. परंतु जे नियमशास्त्र पाळतात आणि नियमशास्त्रांत सांगितल्याप्रमाणे करतात ते नीतिमान ठरतील.

14 कारण जेव्हा यहूदी नसलेले (विदेशी) ज्यांना नियमशास्त्र नाही, मूलतः जरी त्यांना नियमशास्त्र नाही, तरीही नियमशास्त्राप्रमाणे करतात ते स्वतःच नियमशास्त्र आहेत. 15 म्हणजे ते त्यांच्या ह्रदयात नियमशास्त्र लिहिले आहे, असे दाखवतात त्यांची सद्सद्विवेक बुद्धीसुध्दा साक्ष देते आणि त्यांचे एकमेकां विषयीचे विचार त्यांना आरोपी किंवा दोषमुक्त करतात.

16 जेव्हा देव येशू ख्रिस्ताद्वारे मनुष्यांच्या रहस्यांचा, माझ्या सुवार्तेप्रमाणे न्याय करील त्या दिवशी या गोष्टी घडतील.

यहूदी आणि नियमशास्त्र

17 परंतु आता तुम्ही जे स्वतःला यहूदी समजता आणि नियमशास्त्रावर विश्वास ठेवता व आपण देवाच्या जवळचे आहोत असा अभिमान बाळगता, 18 त्या तुम्हांला त्याची इच्छा कळते आणि ज्या सर्वोत्तम गोष्टी आहेत, त्या तुम्ही स्वीकारता कारण नियमशास्त्राद्वारे तुम्हांला शिक्षण मिळाले आहे. 19 तुम्हाला वाटतें की ज्यांना योग्य मार्ग माहित नाही त्यांचे तुम्ही मार्गदर्शक आहात, जे लोक अंधारात (पापांत) आहेत, त्यांचा तुम्ही प्रकाश आहात आणि तुमची खात्री झाली आहे की तुम्ही आंधळ्यांचें पुढारी, जे अंधारात आहेत त्यांचा प्रकाश, 20 मूर्खांचे शिक्षक, बालकांचे गुरु आहात, कारण नियमशास्त्रात तुम्हांला ज्ञान आणि सत्याचे मूर्त स्वरुप मिळाले आहे. 21 तर मग तुम्ही जे दुसऱ्यांना शिकविता ते तुम्ही स्वतःला का शिकवित नाही? तुम्ही चोरी करु नये असा उपदेश करता पण तुम्ही स्वतः चोरी का करता? 22 तुम्ही व्यभिचार करु नये असे म्हणता ते तुम्ही व्यभिचार का करतां? तुम्ही मूर्तिचा तिरस्कार करता पण देवळात चोरी करता? 23 तुम्ही नियमशास्त्राविषयी बढाई मारता, ते तुम्ही नियमशास्त्र मोडून देवाचा अपमान का करता? 24 शास्त्रलेखात लिहिल्यानुसार तुमच्यामुळे “विदेशी लोकांमध्ये देवाच्या नावाचा अपमान होत आहे.” [a]

25 तुम्ही नियमशास्त्र पाळीत असला तर सुंतेला मोल आहे. पण जर तुम्ही नियमशास्त्र पाळीत नाही तर, तुमची सुंता न झाल्यासारखी आहे. 26 सुंता न झालेला मनुष्य जर नियमशास्त्राचे पालन करतो, तर त्याची सुंता न होणे हे सुंता झाल्याप्रमाणे समजण्यात येणार नाही काय? 27 ज्या मनुष्याची शारीरिक रीतीने सुंता झाली नाही आणि जो नियमशास्त्र पूर्ण करतो, तो ज्या तुम्हांला लिखित नियम व सुंता आहे, तरी नियमशास्त्र मोडता त्या तुमचा न्याय करील.

28 कारण जो बाहेरुन यहूदी आहे तो खरोखर यहूदी नाही व देहाची बाह्यत्कारी सुंता ही सुंता नव्हे. 29 पण जो अंतःकरणाचा यहूदी, तो यहूदी आहे आणि खरी सुंता लेखी नियमांद्वारे नव्हे तर आत्म्याने अंतःकरणाची केलेली सुंता होय, त्याची प्रशंसा माणसांकडून नव्हे, तर देवाकडून होते.