Add parallel Print Page Options

इस्राएल पुन्हा उभारला जाईल

36 “मानवपुत्रा, माझ्यावतीने इस्राएलमधील पर्वताशी बोल. त्यांना परमेश्वराचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकायला सांग. त्यांना सांग की परमेश्वर आणि प्रभू पुढील गोष्टी सांगतो. ‘शत्रू तुमच्याविषयी वाईट बोलताना सुखावले, ते म्हणाले की अरे वा! आता प्राचीत पर्वत आमचे होतील.’

“म्हणून माझ्यावतीने इस्राएलमधील पर्वतांशी बोल. त्यांना सांग की परमेश्वर आणि प्रभू असे सांगतो ‘शत्रूने तुमची शहरे नष्ट केली, सर्व बाजूंनी तुमच्यावर हल्ला केला. तुम्ही दुसऱ्या राष्ट्रांचे व्हावे म्हणून त्याने असे केले. मग लोक तुमच्याबद्दल चर्चा करतील. तुमची निंदानालस्ती करतील.’”

म्हणून, इस्राएलच्या पर्वतांनो, परमेश्वराचे, प्रभूचे, म्हणणे ऐका. परमेश्वर व प्रभू पर्वत, टेकड्या, झरे, दऱ्या उजाड भग्नावशेष, आणि सोडून दिलेली शहरे यांना असे सांगतो की, तुमच्या सभोवतालच्या इतर राष्ट्रांकडून तुम्ही लुबाडले गेलात, त्यांनी तुमची टर उडविली. “म्हणून मी वचन देतो की माझ्या बोलण्यात आवेश असेल. मी अदोम आणि इतर राष्ट्रांना माझा राग जाणवून देईन. माझी जमीन त्या लोकांनी स्वतःसाठी घेतली, त्या वेळी त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी ती फक्त लुटण्यासाठी आणि नाश करण्यासाठी घेतली.”

“म्हणून, परमेश्वर माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो: म्हणून माझ्यावतीने इस्राएल देशाशी बोल. पर्वत, टेकड्या, झरे आणि दऱ्या ह्यांच्याशी बोल. त्यांना सांग ‘परमेश्वर, माझा प्रभू म्हणतो मी आवेशाने आणि रागाने बोलेन. का? कारण, इतर राष्ट्रांकडून तुम्हाला अपमान सहन करावा लागला.’”

म्हणून, परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो: “मी वचन देतो की तुमच्या भोवतालच्या राष्ट्रांचीही अप्रतीष्ठा होईल.”

“पण इस्राएलच्या पर्वतांनो, माझ्या लोकांकरिता इस्राएल लोकांसाठी तुम्ही झाडे वाढवाल आणि ती फळांनी बहरतील. माझे लोक लवकरच परत येतील. मी तुमच्याबरोबर आहे. मी तुम्हाला मदत करीन. लोक तुमच्या जमिनीची मशागत करतील, बी पेरतील. 10 तुमच्यावर खूप लोक राहतील. सर्व इस्राएल लोक तेथे राहतील. शहरे लोकांनी गजबजील. नाश झालेली ठिकाणे पुन्हा नव्यासारखी उभारली जातील. 11 मी तुम्हाला खूप लोक व प्राणी देईन. त्यांची संतती वाढेल पूर्वीप्रमाणे लोक राहू लागतील. मी तुम्हाला, आरंभी होता त्यापेक्षा चांगले करीन. मग तुम्हाला कळेल की मी परमेश्वर आहे. 12 हो! मी लोकांना माझ्या माणसांना, हे इस्राएल तुझ्यावरुन चालायला लावीन. ते तुला स्वीकारतील आणि तू त्यांचा होशील, तू पुन्हा त्यांना अपत्यहीन करणार नाहीस.”

13 परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो: “इस्राएल देश, लोक तुझ्याविषयी वाईट बोलतात. ते म्हणतात की तू तुझ्या लोकांचा नाश केलास, तू मुले दूर नेलीस. 14 ण यापुढे तू लोकांचा नाश करणार नाहीस, मुले दूर नेणार नाहीस.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला. 15 “यापुढे इतर राष्ट्रांना मी अपमान करु देणार नाही. ते तुझी अप्रतिष्ठा करणार नाहीत. तू आणखी तुझी मुले गमावणार नाहीस.” परमेश्वर, माझा प्रभू, हे म्हणाला.

परमेश्वर स्वतःच्या कीर्तींचे रक्षण करील

16 मग परमेश्वराचे शब्द मला ऐकू आले, तो म्हणाला, 17 “मानवपुत्रा, इस्राएलचे लोक त्यांच्या स्वतःच्या देशात राहिले. पण दुष्कृत्ये करुन त्यांनी तो देश गलिच्छ केला. रजस्वला स्त्रीप्रमाणे ते मला अशौच होते. 18 देशात लोकांना ठार करुन त्यांनी त्या भूमीवर रक्त सांडले. त्यांच्या मूर्तीनी देश अमंगळ केला, म्हणून मी त्यांना माझा क्रोध किती आहे ते दाखविले. 19 मी त्यांना राष्ट्रा-राष्ट्रांत पसरविले आणि सर्व जगात विखरुन टाकले. त्यांच्या दुष्कृत्यांबद्दल मी त्यांना अशीच शिक्षा केली. 20 ते त्या दुसऱ्या राष्ट्रांत गेले. तेथेही त्यांनी माझे पवित्र नाव धुळीला मिळवले, राष्ट्रे त्यांच्याबद्दल बोलली. ती म्हणाली, ‘हा परमेश्वर आहे तरी कसा? हे परमेश्वराचे लोक आहेत, पण त्यांनी त्याची भूमी सोडली.’

21 “इस्राएलच्या लोकांनी माझे पवित्र नाव बदनाम केले. त्याबद्दल मला खेद वाटला. 22 म्हणून इस्राएलच्या लोकांना सांग की परमेश्वर, प्रभू पुढील गोष्टी सांगतो ‘इस्राएल लोकानो, तुम्ही जेथे जेथे गेलात, तेथे तेथे तुम्ही माझे पवित्र नाव बदनाम केलेत. हे थांबविण्यासाठी मी काहीतरी करीन. ते मी तुमच्यासाठी म्हणून करणार नाही, तर माझ्या पवित्र नावासाठी करीन. 23 मी त्या मोठ्या राष्ट्रांना दाखवून देईन की माझे नाव खरोखरच पवित्र आहे. तुम्ही त्या राष्ट्रांत माझ्या पवित्र नावाला कलंक लावलात. पण मी पवित्र आहे. हे मी तुम्हाला दाखवून देईन. मग त्या राष्ट्रांना, मी परमेश्वर असल्याचे, समजेल.’” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.

24 देव म्हणाला, “मी तुम्हाला त्या राष्ट्रांतून बाहेर काढून एकत्र करीन आणि तुमच्या देशात तुम्हाला परत आणीन. 25 मग तुमच्यावर शुद्ध पाणी शिंपडून मी तुम्हाला शुद्ध करीन. तुमची घाण मी धुवून काढीन. त्या ओंगळ मूर्तीचीही घाण मी धुवून काढीन आणि तुम्हाला शुद्ध करीन.” 26 देव म्हणाला, “मी तुमच्यात नवीन आत्मा घालून नवे ह्दय बसवीन तुमचे दगडाचे ह्दय बदलून त्या जागी माणसाचे कोमल ह्दय बसवीन. 27 मी माझा आत्मा तुम्हाला देईन. मग तुम्ही बदलाल व माझे नियम पाळाल. काळजीपूर्वक माझ्या आज्ञा पाळाल. 28 मग तुम्ही, मी तुमच्या पूर्वजांना दिलेल्या, देशात राहाल. तुम्ही माझे व्हाल व मी तुमचा देव होईल.” 29 देव पुढे म्हणाला, “तसेच, मी तुमचे रक्षण करीन व तुम्हाला अपवित्र होऊ देणार नाही. मी पिकांना वाढायची आज्ञा देईन व तुमच्यावर उपासमारीची वेळ येऊ देणार नाही. 30 मी तुमच्या फळबागाचे आणि शेतांचे उत्पादन वाढवीन मग तुम्हाला कधीही परक्या देशात भुकेने व्याकूळ होऊन लज्जित व्हावे लागणार नाही. 31 तुम्ही केलेल्या वाईट गोष्टी तुम्हाला आठवतील. त्या गोष्टी चांगल्या नव्हत्या, हे तुम्हाला स्मरेल. मग तुम्ही केलेल्या पापाबद्दल आणि भयानक कृत्यांबद्दल स्वतःचाच तिरस्कार कराल.”

32 परमेश्वर, माझा प्रभू, म्हणतो, “तुम्ही पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्या असे मला वाटते. तुमच्या भल्याकरिता मी ह्या गोष्टी करीत नाही. मी माझ्या नावाकरिता त्या करीत आहे म्हणून इस्राएल लोकांनो, तुम्ही ज्या तऱ्हेने जगलात, त्याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे, तुम्ही ओशाळे झाले पाहिजे.”

33 परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो, “ज्या दिवशी मी तुमची पापे धूवून काढीन, त्या दिवशी मी लोकांना गावांत परत आणीन. विद्ध्वंस झालेली गावे पुन्हा वसविली जातील. 34 जी भूमी, तिच्या जवळून जाणाऱ्या प्रत्येकाला, भग्नावशेषांच्या ढिगाप्रमाणे दिसत होती, तीच मशागत केल्याप्रमाणे दिसेल. 35 वाटसरु म्हणतील, ‘पूर्वी, ह्या प्रदेशाचा विद्ध्वंस झाला. पण आता तोच एदेनच्या बागेप्रमाणे झाला आहे. शहरांचा नाश झाला. ती उद्ध्वस्त व ओसाड झाली. पण आता ती सुरक्षित आहेत आणि त्यांत लोकांनी वस्ती केली आहे.’”

36 देव म्हणाला, “मग तुमच्या सभोवतालच्या राष्ट्रांना कळेल की मीच परमेश्वर आहे आणि मीच नष्ट झालेली ठिकाणे पुन्हा उभारली. ओसाड जमिनीत मी पेरणी केली. मी परमेश्वर आहे. मी हे बोललो, ते मी घडवून आणीन.”

37 परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो, “इस्राएलचे लोक मला त्यांच्याकरिता पुढील गोष्टी करण्यास सांगतील: त्यांची संख्या मी पुष्कळ मोठी करावी. त्यांना मेंढ्यांच्या कळपाप्रमाणे करावे. 38 यरुशलेमच्या खास सणांमध्ये असतात त्याप्रमाणे पवित्र मेंढ्या व बोकडांच्या पुष्कळ कळपांप्रमाणे पुष्कळ लोक तेथे राहतील. गावे व नष्ट झालेल्या जागा लोकांनी गजबजून जातील. मग त्यांना, मी देव आहे हे कळेल.”