Add parallel Print Page Options

येशू घटस्फोटाविषयी शिकवितो(A)

10 नंतर येशूने ती जागा सोडली आणि यहूदीया प्रांतात व यार्देन ओलांडून पलीकडे गेला. लोक पुन्हा गटागटाने त्याच्याकडे आले. आणि जसा त्याचा परिपाठ होता तसे त्याने त्यांना शिकविले.

काही परुशी येशूकडे आले. त्यांनी त्याला विचारले, “आपल्या पत्नीला घटस्फोट द्यावा हे मनुष्यासाठी कायदेशीर आहे काय?” हे तर त्यांनी त्याची परीक्षा पाहण्यासाठी विचारले.

येशूने त्यांना उत्तर दिले, “मोशेने तुम्हांला काय आज्ञा दिली आहे?”

ते म्हणाले, “मोशेने पुरूषाला सुटपत्र लिहिण्याची व असे करून आपल्या बायकोला सोडण्याची परवानगी दिली आहे.”

येशू म्हणाला, “कारणकेवळ तुमच्या हट्टामुळे मोशेने तुमच्यासाठी ही पर्यायी अनुमति दिली (लिहिली) आहे. परंतु उत्पत्तीच्या आरंभापासून देवाने त्यांना पुरूष व स्त्री असे निर्माण केले. [a] या कारणामुळे पुरुष आपल्या आईवडिलांना सोडील व आपल्या पत्नीशी जडून राहील. आणि ती दोघे एकदेह होतील. [b] म्हणून यापुढे ती दोन नाहीत तर एकदेह आहेत. यासाठी देवाने जे जोडले आहे ते मनुष्याने वेगळे करू नये.”

10 नंतर, येशू व शिष्य घरात असता शिष्यांनी या गोष्टीविषयी त्याला विचारले, 11 येशू त्यांना म्हणाला, “जो कोणी आपली पत्नी टाकतो व दुसरीबरोबर लग्न करतो तो आपल्या पत्नीविरुद्ध व्यभिचार करतो. 12 आणि जर पत्नी आपल्या नवऱ्याला सोडते आणि दुसऱ्याबरोबर लग्न करते तर तीही व्यभिचार करते.”

येशू मुलांचा स्वीकार करतो(B)

13 त्याने त्यांना स्पर्श करावा, यासाठी लोक लहान बालकांना त्याच्याकडे आणीत होते. परंतु शिष्यांनी त्यांना दटावले 14 येशूने हे पाहिले तेव्हा तो रागावला आणि त्यांना म्हणाला, “लहान बालकांना माझ्याकडे येऊ द्या. त्यांना मना करू नका कारण देवाचे राज्य यांच्यासारख्यांचेच आहे. 15 मी तुम्हांस खरे सांगतो, जो कोणी बालकासारखा देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही त्याचा तेथे कधीही प्रवेश होणार नाही.” 16 तेव्हा त्याने बालकांना उचलून जवळ घेतले. आपले हात त्यांच्यावर ठेवले आणि आशिर्वाद दिला.

श्रीमंत मनुष्य अनुसरण्याचे नाकारतो(C)

17 येशू प्रवासाला निघाला असता एक मनुष्य त्याच्याकडे धावत आला आणि त्याच्यापुडे गुडघे टेकून म्हणाला, “उत्तम गुरूजी, अनंतकाळचे जीवन मिळण्यासाठी मी काय करावे?”

18 येशू त्याला म्हणाला, “तू मला उत्तम का म्हणतोस? एका देवाशिवाय कोणी उत्तम नाही. 19 तुला आज्ञा माहीत आहेतच: खून करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, फसवू नको, आपल्या वडिलांचा व आपल्या आईचा सन्मान कर.”

20 तो मनुष्य म्हणाला, “गुरूजी, मी तरूणपणापासून या आज्ञा पाळत आलो आहे.”

21 येशूने त्याच्याकडे पाहिले त्याला त्याच्याविषयी प्रेम वाटले. तो त्याला म्हणाला, “तुझ्यामध्ये एका गोष्टीची उणीव आहे. जा, तुझ्याजवळ जे सर्व आहे ते वीक. नंतर ते गोरगरिबांस वाटून टाक, स्वर्गात तूला संपत्ती प्राप्त होईल. तर मग चल आणि माझ्या मागे ये.”

22 हे शब्द ऐकून तो मनुष्य खूप निराश झाला व खिन्न होऊन निघून गेला कारण त्याच्याजवळ खूप संपत्ति होती.

23 येशूने सभोवताली पाहिले व तो आपल्या शिष्यांना म्हणाला, “ज्याच्याजवळ संपत्ति आहे त्याचा देवाच्या राज्यात (श्रीमंतांचा) प्रवेश होणे किती कठीण आहे.”

24 त्याचे शब्द ऐकून शिष्य थक्क झाले, परंतू येशू त्यास म्हणाला, “माझ्या मुलांनो, देवाच्या राज्यात श्रीमंताचा प्रवेश होणे किती कठीण आहे! 25 श्रीमंतांचा देवाच्या राज्यात प्रवेश होणे यापेक्षा उटांला सुईच्या नेढयातून जाणे सोपे आहे.”

26 ते यापेक्षाही अधिक आश्चर्यचकित झाले आणि एकमेकाला म्हणाले, “तर मग कोणाचे तारण होणे शक्य आहे?”

27 त्यांच्याकडे पाहून येशू म्हणाला, “मनुष्यांना हे अशक्य आहे पण देवाला अशक्य नाही. कारण सर्व गोष्टी देवाला शक्य आहेत.”

28 पेत्र त्याला म्हणू लागला, “पाहा, आम्ही सर्व सोडले आणि आपल्या मागे आलो आहोत.”

29 येशू म्हणाला, “मी तुम्हांला खरे सांगतो की, ज्या कोणी माझ्यासाठी व सुवार्तेसाठी आपले घर, भाऊ, बहिणी, आईवडील, मुले किंवा शेतीवाडी सोडली, त्याचा छळ झाला तरी 30 त्याला शंभरपटीने फायदा मिळेल आणि येणाऱ्या युगात त्याला अनंतकाळचे जीवन मिळाल्याशिवाय राहणार नाही. 31 परंतु ज्यांना सध्या मोठे स्थान आहे भविष्यात त्यांना खालचे स्थान मिळेल व ज्यांना खालचे स्थान आहे त्यांना मोठे स्थान मिळेल.”

येशू पुन्हा आपल्या मरणाविषयी सांगतो(D)

32 ते वर यरूशलेमेच्या रस्त्यावरून जात असता येशू त्यांच्यापुढे चालत होता. त्याचे शिष्य विस्मित झाले होते आणि त्याच्यामागून येणारे घाबरले होते. नंतर येशूने त्या बारा शिष्यांना पुन्हा एका बाजूला घेतले आणि स्वतःच्या बाबतीत काय घडणार आहे हे त्यांना सांगू लागला. 33 “ऐका! आपण वर येरूशलेमेस जात आहोत आणि मनुष्याचा पुत्र विश्वासघाताने धरून मुख्य याजक आणि नियमशास्त्राचे शिक्षक यांच्या हाती दिला जाईल. ते त्याला मरणाची शिक्षा देतील आणि ते त्याला यहूदीतर लोकांच्या हाती देतील. 34 ते त्याची थटृटा करतील, त्याच्यावर थुंकतील, त्याला फटके मारतील, ठार करतील आणि तीन दिवसांनी तो पुन्हा उठेल.”

याकोब व योहान येशूला मदतीसाठी विचारतात(E)

35 याकोब व योहान हे जब्दीचे मुलगे त्याच्याकडे आले. आणि त्याला म्हणाले, “गुरुजी, आम्ही आपणांजवळ जे मागू ते आपण आमच्यासाठी करावे अशी आमची इच्छा आहे.”

36 येशू त्यांना म्हणाला, “मी तुमच्यासाठी काय करावे अशी तुमची इच्छा आहे?”

37 ते म्हणाले, “आपल्या वैभवात आमच्यापैकी एकाला तुमच्या उजवीकडे व दुसऱ्याला डावीकडे बसण्याचा अधिकार द्यावा.”

38 येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही काय मागत आहात हे तुम्हांस कळत नाही. मी जो प्याला पिणार आहे, तो तुमच्याने पिणे शक्य आहे काय? किंवा मी जो बाप्तिस्मा घेणार आहे तो तुमच्याने घेणे शक्य आहे काय?”

39 ते त्याला म्हणाले, “आम्हांस शक्य आहे.”

मग येशू त्यांना म्हणाला, “मी जो प्याला पिणार आहे तो तुम्ही प्याल आणि जो बाप्तिस्मा घेईन तो तुम्ही घ्याल, 40 परंतु माझ्या उजवीकडे किंवा डावीकडे बसू देणे माझ्या हाती नाही. ज्यांच्यासाठी त्या जागा तयार केल्या आहेत, त्यांच्यासाठीच त्या राखून ठेवल्या आहेत.”

41 दहा शिष्यांनी या विनंतिविषयी ऐकले तेव्हा ते याकोब व योहानावर फार रागावले. 42 येशूने त्यांना जवळ बोलाविले आणि म्हटले, “तुम्हांस माहीत आहे की, परराष्ट्रीयांची जे सत्ताधारी आहेत ते त्यांच्यावर स्वामित्व गाजवितात आणि त्यांचे पुढारी त्यांच्यावर अधिकार गाजवितात. 43 परंतु तुमच्याबाबतीत तसे नाही. तुमच्यातील जो कोणी मोठा होऊ पाहतो त्याने तुमचा सेवक झाले पाहिजे. 44 आणि जो कोणी पाहिला होऊ इच्छितो त्याने सर्वांचा सेवक झाले पाहिजे. 45 कारण मनुष्याचा पुत्रही सेवा करून घ्यावयास नाही तर तो सेवा करावयास आला आहे. व अनेकांसाठी आपले जीवन खंडणी म्हणून देण्यासाठी आला आहे.”

येशू आंधळ्याला बरे करतो(F)

46 मग ते यरीहोस आले. येशू आपले शिष्य व लोकसमुदायासह यरीहो सोडून जात असता तिमयाचा मुलगा बार्तीमय हा एक आंधळा भिकारी रस्त्याच्या कडेला बसला होता. 47 जेव्हा त्याने ऐकले की, नासरेथचा येशू जात आहे तेव्हा तो मोठ्याने ओरडून म्हणू लागला, “येशू, दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा.”

48 तेव्हा त्याने गप्प बसावे म्हणून अनेकांनी त्याला दटावले. पण तो अधिक मोठ्याने ओरडून म्हणू लागला. “येशू दाविदाचे पुत्र मजवर दया करा.”

49 मग येशू थांबला आणि म्हणाला, “त्याला बोलवा.”

तेव्हा त्यांनी आंधळ्या मनुष्याला बोलाविल आणि म्हटले, “धीर धर, येशू तुला बोलावीत आहे.” 50 त्या आंधळ्याने आपला झगा टाकला, उडी मारली व तो येशूकडे आला.

51 येशू त्याला म्हणाला, “मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे?”

आंधळा मनुष्य त्याला म्हणाला, “गुरुजी मला पुन्हा दृष्टी प्राप्त व्हावी.”

52 मग येशू त्याला म्हणाला, “जा! तू विश्वास ठेवलास म्हणून तू बरा झाला आहेस.” लगेच तो पाहू शकला (त्याला दृष्टी आली) आणि रस्त्याने तो येशूच्या मागे चालू लागला.