Add parallel Print Page Options

विशेष कामासाठी सात जणांची निवड केली जाते

अधिकाधिक लोक येशूचे अनुयायी होत होते. पण याचवेळी ग्रीक बोलणाऱ्या अनुयायांचा यहूदी अनुयायांशी वाद झाला. ते म्हणाले की, अनुयायांना मिळणारा जो रोजचा अन्नाचा वाटा असतो, तो त्यांच्या विधवांना मिळण्याविषयी दुर्लक्ष होते. बारा प्रेषितांनी सर्व अनुयायांना एकत्र बोलाविले.

प्रेषित त्यांना म्हणाले, “देवाचे वचन शिकविण्याचे आमचे काम थांबलेले आहे. हे चांगले नाही! लोकांना काही खाण्यासाठी देणे यापेक्षा देवाचे वचन सातत्याने शिकविणे हे आमच्यासाठी अधिक चांगले. म्हणून बंधूनो, तुमचे स्वतःचे सात लोक निवडा. लोकांनी त्यांना हे चांगले आहेत असे म्हटले पाहिजे. ते ज्ञानाने व आत्म्याने पूर्ण भरलेले असावेत. आणि त्यांना ही सेवा करण्यास आपण देऊ. मग आपण संपूर्ण वेळ प्रार्थना करण्यात व देवाचे वचन शिकविण्यात घालवू शकतो.”

बंधुवर्गातील सगळ्यांना ही कल्पना आवडली. मग त्यांनी या सात जणांची निवड केली: स्तेफन (मोठा विश्वास व पवित्र आत्म्याने पूर्ण भरलेला मनुष्य, फिलिप्प), [a] प्रखर, नीकनोर, तिम्मोन, पार्मिना आणि निकलाव (अंतुखियाकर जो यहूदी झाला होता). नंतर त्यांनी या सात जणांना प्रेषितांसमोर उभे केले. प्रेषितांनी त्यांच्यावर हात ठेवले व प्रार्थना केली.

देवाचे वचन जास्तीत जास्त लोकांपर्यंत जात होते. यरुशलेममधील अनुयायांचा गट मोठा होत होता. एकढेच नव्हे तर एका मोठ्या यहूदी याजकवर्गाने विश्वास ठेवला व आज्ञा पाळल्या.

स्तेफनाविरुद्ध यहूदी लोक

स्तेफन (सात लोकांपैकी एक) यास मोठा आशीर्वाद मिळाला. देवाने त्याला लोकांसमोर अद्भूत चमत्कार करण्याचे सामर्ध्य दिले होते. परंतु काही यहूदी आले आणि त्यांनी स्तेफनाबरोबर वाद घातला. हे यहूदी सभास्थानातून [b] आले होते. त्याला लिबर्तीनांसाठी सभास्थान असे म्हणत. (हे सभास्थान कुरेने, आणि अलेक्सांद्र येथील यहूदी लोकांसाठी सुद्धा होते). किलीकिया व आशियातील यहूदीसुद्धा त्यांच्याबरोबर होते. ते सर्व आले आणि स्तेफानबरोबर वाद घालू लागले. 10 परंतु ज्या ज्ञानाने व आत्म्याच्या प्रेरणेने स्तेफन बोलत होता त्यापुढे यहूदी लोकांचा टिकाव लागेना.

11 तेव्हा त्यांनी काही लोकांना पैसे दिले व असे बोलायला शिकविले की, “आम्ही स्तेफनाला मोशे व देव यांच्यावरुध्द दुर्भाषण करताना म्हणजे वाईट गोष्टी बोलताना ऐकले.” 12 त्यामुळे लोकसमुदाय, यहूदी वडीलजन आणि परुशी लोक भडकले. ते इतके चिडले की, त्यांनी येऊन स्तेफनाला धरले. आणि त्याला यहूदी लोकांच्या (पुढाऱ्यांच्या) सभेत नेले.

13 आणि त्यांनी तेथे खोटे साक्षीदार आणले, ते म्हणाले, “हा मनुष्य (स्तेफन) पवित्र मंदिराविषयी नेहमी वाईट बोलतो. आणि तो मोशेच्या नियमशास्त्राविषयी नेहमी वाईट बोलतो. 14 आम्ही त्याला असे बोलताना ऐकले आहे की, नासरेथचा येशू ही जागा नष्ट करील आणि मोशेने घालून दिलेल्या चालीरीती बदलून टाकील.” 15 धर्मसभेत बसलेल्या सर्व सभासदांनी स्तेफनाकडे न्याहाळून पाहिले. तेव्हा त्याचा चेहरा देवदूताच्या चेहऱ्यासारखा दिसत होता.

Footnotes

  1. प्रेषितांचीं कृत्यें 6:5 फिलिप्प प्रेषित फिलिप्प नव्हे.
  2. प्रेषितांचीं कृत्यें 6:9 सभास्थान या ठिकाणी (इमारतीत) यहूदी लोक देवाचे वचन वाचण्यासाठी व अभ्यासण्यासाठी येत असत.