Add parallel Print Page Options

सार्दीस येथील मंडळीला

“सार्दीस येथील मंडळीच्या दूताला लिही:

“जो देवाचे सात आत्मे धरतो व सात तारे धरतो त्याचे हे शब्द आहेत.

“मला तुमची कामे माहीत आहेत, जिवंत असण्याबद्दल तुमचा लौकिक आहे. पण तुम्ही मेलेले आहात. जागे व्हा! जे उरलेले आहेत आणि मरणाच्या ह्यामार्गावर आहेत त्यांना मजबूत करा. कारण माझ्या देवाच्या दृष्टीने तुमची कृत्ये पूर्ण झाल्याचे मला आढळले नाही. म्हणून लक्षात ठेवा, जे तुम्हाला प्राप्त झालेले आहे आणि जे तुम्ही ऐकले आहे त्याप्रमाणे वागा. आणि पश्चात्ताप करा. पण जर तुम्ही जागे होत नाही, तर मी एखाद्या चोरासारख येईन आणि तुम्हाला हे कळणार नाही की मी नेमक्या कोणत्या वेळेला तुमच्याकडे येईन.

“तरी तुमच्यात थोडे लोक आहेत जे सार्दीसमध्ये आहेत ज्यांनी स्वतःला स्वच्छ राखले आहे. ते लोक माझ्याबरोबर चालतील. ते पांढरी वस्त्रे घालतील कारण ते पात्र आहेत. प्रत्येक व्यक्ति जी विजय मिळविते, ती त्यांच्यासारखी पांढरी वस्त्रे परिधान करील. मी त्या व्यक्तीचे नाव जीवनाच्या पुस्तकातून काढणार तर नाहीच पण माझ्या पित्यासमोर व त्याच्या देवदूतांसमोर त्याचे नाव स्वीकारीन, आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको.

फिलदेल्फिया येथील मंडळीला

“फिलदेल्फिया येथील मंडळीच्या दूताला लिही:

“जो पवित्र, सत्य, जो दाविदाची किल्ली ठेवतो त्याचे हे शब्द आहेत, जे तो उघडतो, ते कोणी बंद करु शकणार नाही आणि जे तो बंद करतो ते कोणी उघडू शकणार नाही.

“मला तुमची कामे माहीत आहेत, पाहा मी तुमच्यासमोर दार उघडे करुन ठेवले आहे. जे कोणीही बंद करु शकणार नाही. मला माहीत आहे की, तू दुर्बळ आहेस, तरी तू माझा शब्द पाळला आहेस, आणि माझे नाव नाकारले नाहीस. जे सैतानाच्या सभास्थानाचे आहेत, ते स्वतःला यहूदी समजतात पण ते यहूदी नाहीत तर ते खोटारडे आहेत. मी त्यांना तुमच्याकडे आणून तुमच्या पाया पडायला लावीन. आणि त्यांना समजेल की मी तुमच्यावर प्रीति केली आहे. 10 धीराने सहन करण्याविषयी तुम्ही माझी आज्ञा पाळली आहे. म्हणून सर्व जगावर जो संकटाचा समय येणार आहे त्यापासून मी तुम्हांला राखीन. हा त्रास जे लोक या पृथ्वीवर राहातात त्यांची परीक्षा होण्यासाठी होईल.

11 “मी लवकर येत आहे, जे तुझ्याकडे आहे त्याला घट्ट धरुन राहा यासाठी की कोणीही तुझा मुगुट घेऊ नये. 12 जो विजय मिळवितो त्याला मी माझ्या देवाच्या मंदिराचा खांब बनवीन. तो पुन्हा कधीही त्याला सोडणार नाही. मी त्याच्यावर माझ्या देवाचे नाव व माझ्या देवाच्या शहराचे नाव नवे यरुशलेम असे लिहीन. जे माझ्या देवापासून स्वर्गातून खाली येत आहे. आणि मी त्याच्यावर माझे नवे नाव लिहीन. 13 आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको.

लावदिकीया येथील मंडळीला

14 “लावदिकीया येथील मंडळीच्या दूताला लिही:

“जो आमेन [a] आहे, विश्वासू आणि खरा साक्षीदार आहे, देवाच्या निर्मितीवरील सत्ताधीश आहे त्याचे हे शब्द आहेत.

15 “मला तुमची कामे माहीत आहेत तुम्ही थंडही नाही व गरमही नाही. माझी अशी इच्छा आहे की, तुम्ही दोन्हीपैकी एक काहीतरी असावे! 16 पण, तुम्ही कोमट असल्याने मी तुम्हांला तोंडातून (थुंकून) टाकणार आहे. 17 तुम्ही म्हणता, मी श्रीमंत आहे, मी संपत्ति मिळविली आहे. आणि मला कोणत्याही गोष्टीची गरज नाही. पण तुम्हाला याची जाणीव होत नाही की, तुम्ही नीच, नराधम, दयनीय, गरीब, आंधळे व ओंगळ आहात. 18 मी तुम्हाला सल्ला देतो की, अग्नीत शुद्ध केलेले सोने माझ्याकडून विकत घ्या. म्हणजे तुम्ही श्रीमंत व्हाल. आणि शुभ्र वस्त्रे विकत घ्या व तुमची लज्जास्पद नग्नता तुम्ही झाका. आणि स्पष्ट दिसावे म्हणून डोळ्यात घालण्यास अंजन विकत घ्या.

19 “ज्यांच्यावर मी प्रेम करतो, त्यांना दटावतो व शिस्त लावतो म्हणून कसोशीचे प्रयत्न करावयास लागा आणि पश्चात्ताप करा. 20 मी येथे आहे! मी दाराजवळ उभा राहतो व दार ठोठावतो. जर कोणी माझा आवाज ऐकतो आणि दार उघडतो, तर मी आत येईन आणि त्याच्याबरोबर जेवीन व तोही माझ्याबरोबर जेवेल.

21 “जो विजय मिळवील त्याला मी माझ्या सिंहासनावर बसण्याचा अधिकार देईन ज्याप्रमाणे मी विजय मिळविला आणि माझ्या पित्याच्या सिंहासनावर बसलो. 22 आत्मा मंडळ्यास काय म्हणतो, हे ज्याला कान आहेत तो ऐको.”

Footnotes

  1. प्रकटीकरण 3:14 आमेन या ठिकाणी येशूचे नाव म्हणून वापरले आहे. याचा अर्थ जे सत्य आहे त्याचे जोरदारपणे समर्थन करणे.