Add parallel Print Page Options

ईयोब परमेश्वराला उत्तर देतो

42 नंतर ईयोबाने परमेश्वराला उत्तर दिले, तो म्हणाला:

“परमेश्वरा सर्वकाही तूच करु शकतोस ते मला माहीत आहे.
    तू योजना आखतोस आणि त्या प्रत्यक्षात येण्यास कोणीही आणि काहीही प्रतिबंध करु शकत नाही.
परमेश्वरा, तू प्रश्र विचारलास: ‘हा अज्ञानी माणूस कोण आहे जो असे मूर्खासारखे [a] बोलतो आहे?’
    परमश्वरा मला ज्या गोष्टी कळत नव्हत्या त्यांच्याविषयीच मी बोलत होतो.
    ज्या गोष्टी समजणे माझ्या आवाक्याबाहेरचे होते त्यांच्याविषयी मी बोलत होतो.

“परमेश्वरा, तू मला म्हणालास, ‘ईयोबा, तू ऐक, मी बोलेन.
    मी तुला प्रश्न विचारेन आणि तू मला उत्तर दे.’
परमेश्वरा, मी तुझ्याबद्दल पूर्वी ऐकले होते.
    परंतु आता मी माझ्या डोळ्यांनी तुला बघतो आहे.
आणि परमेश्वरा आता मलाच माझी लाज वाटते.
    मला पश्चात्ताप होत आहे.
मी आता धुळीत आणि राखेत [b] बसून माझे मन
    आणि माझे आयुष्य बदलण्याचे वचन देत आहे.”

परमेश्वर ईयोबाचे ऐश्वर्य परत देतो

परमेश्वराचे ईयोबाशी बोलणे झाल्यावर तो तेमानीच्या अलीफजला म्हणाला, “मला तुझा आणि तुझ्या दोन मित्रांचा राग आला आहे. का? कारण तुम्ही माझ्याबद्दल योग्य बोलला नाही. परंतु ईयोब माझा सेवक आहे. तो माझ्याविषयी बरोबर बोलला. म्हणून अलीफज, आता सात बैल आणि सात एडके घे. ते घेऊन माझ्या सेवकाकडे, ईयोबाकडे जा. त्यांना मार आणि त्यांचा स्वतःसाठी होमबली अर्पण कर. माझा सेवक ईयोब तुमच्यासाठी प्रार्थना करेल आणि मी त्याच्या प्रार्थनेला उत्तर देईन. मग मी तुम्हाला योग्य असलेली शिक्षा देणार नाही. तुम्ही अतिशय मुर्ख होता म्हणून तुम्हाला शिक्षा करायला हवी. तुम्ही माझ्याविषयी नीट बोलला नाही. परंतु माझा सेवक ईयोब मात्र माझ्याबद्दल अगदी योग्य बोलला.”

तेव्हा अलीफज तेमानी, बिल्दद शूही आणि सोफर नामाथीचा यांनी देवाचे ऐकले. नंतर परमेश्वराने ईयोबाच्या प्रार्थनेला उत्तर दिले.

10 ईयोबाने त्याच्या मित्रांसाठी प्रार्थना केली आणि परमेश्वराने ईयोबाला पुन्हा यशस्वी केले. देवाने त्याला पूर्वी त्याच्याकडे होते त्यापेक्षा दुप्पट दिले. 11 ईयोबाचे सगळे भाऊ आणि बहिणी त्याच्या घरी आले. ईयोबाला जो कोणी ओळखत होता तो ही त्याच्याकडे आला. त्यांनी ईयोबबरोबर भोजन घेतले. त्यांनी ईयोबाचे सांत्वन केले. परमेश्वराने ईयोबावर इतकी संकटे आणली त्याचे त्यांना वाईट वाटले. प्रत्येकाने ईयोबाला चांदीचा तुकडा [c] आणि सोन्याची अंगठी दिली.

12 परमेश्वराने ईयोबाच्या आयुष्याच्या उत्तरार्धावर त्याच्या पूर्वार्धापेक्षा अधिक कृपा केली. ईयोबाकडे आता 14,000 मेंढ्या, 6,000 उंट, 2,000 गायी आणि 1,000 गाढवी आहेत. 13 ईयोबाला सात मुले आणि तीन मुली झाल्या. 14 ईयोबाने त्याच्या पहिल्या मुलीचे नाव यमीमा, दुसऱ्या मुलींचे नाव कसीया ठेवले. तिसऱ्या मुलीचे नाव केरेन हप्पूक ठेवले. 15 त्याच्या मुली त्या देशातील सर्वात सुंदर मुली होत्या, ईयोबाने त्याच्या मुलींना त्याच्या मालमत्तेतला वाटा दिला. त्यांच्या भावांनासुध्दा ईयोबाच्या मालमत्तेतला वाटा मिळाला.

16 अशा तऱ्हेने ईयोब 140 वर्षे जगला. तो त्याची मुले, नातवंडे, पंतवंडे पाहीपर्यंत जगला. 17 नंतर ईयोब मरण पावला. ईयोब चांगले आयुष्य जगला. तो अगदी वयोवृध्द होऊन मेला.

Footnotes

  1. ईयोब 42:3 कोण … मूर्खासारखे “मूर्ख शब्दांत सल्ला लपवीत आहे असा कोण आहे?”
  2. ईयोब 42:6 धूळ आणि राख आपण खूप दु:खात आहोत असे दाखविण्यासाठी लोक धुळीत आणि राखेत बसत असत.
  3. ईयोब 42:11 चांदीचा तुकडा शब्दश: “केशीय” पितृसत्ताक पध्दत अस्तित्वात होती तेव्हा हे माप वापरीत असत. पाहा उत्पत्ति 33:19 आणि यहोशवा 24:32.